राजापूर:- तालुक्यातील शेढे परिसरात आंब्याच्या बागेत एका ६८ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शामराव बावकर (वय ६८, रा. शेढे वरचीवाडी, ता. राजापूर) हे ४ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्यापूर्वी मौजे शेढे सीमातील राजेंद्र फाटक यांच्या आंब्याच्या बागेत आंब्याच्या झाडाखाली मृतावस्थेत आढळून आले. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.









