रत्नागिरी:- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी कर्मचार्यांनी मागील महिनाभर संप सुरु ठेवला आहे. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी संपकरी कर्मचार्यांना कामावर परतण्यासाठी आज सोमवारची ‘डेडलाईन’ दिली असली तरी अशा कितीही डेडलाईन दिल्या तरी आम्ही माघार घेणार नसून न्यायालयाच्या निर्णयापर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचार्यांनी निक्षून सांगितले आहे.
ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्यांनी संपाला सुरुवात केली. राज्यातील प्रत्येक आगाराबाहेर कर्मचारी आंदोलन करत आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथेही कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांची पगारवाढ केली. मात्र, तरीही संप मागे घेण्यात आला नाही. यानंतर कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई, बदली करत त्यांच्यावर प्रशासनाने दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, कर्मचार्यांनी कोणत्याही दबावासमोर न झुकता संप सुरूच ठेवला.
शुक्रवारी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी संपकरी कर्मचार्यांना सोमवारपर्यंत कामावर परतण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. जे कर्मचारी कामावर परततील त्यांच्यावरील निलंबनाची व बदल्यांची कारवाई मागे घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र, निलंबन मागे घेतले तरी कोणती ना कोणती कारवाई होणारच, अशी भावना कर्मचार्यांमध्ये आहे. न्यायालयात पुढील सुनावणी दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत कर्मचारी संपावर ठाम आहेत.
दरम्यान, शनिवारी माळनाका येथील विभागीय कार्यशाळेसमोर आंदोलन करणार्या एसटी कर्मचार्यांची मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचार्यांना पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचार्यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यास भाग पाडू. कर्मचार्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, असे त्यांनीही सांगितले.
जिल्ह्यात शनिवारी नऊ आगारातून 104 फेर्या सोडण्यात आल्या. त्यातून 2092 प्रवाशांनी प्रवास केला. आतापर्यंत बंद असलेल्या रत्नागिरी डेपोतील ग्रामीण विभागातून दोन फेर्या शनिवारी सुटल्या. रत्नागिरी-पावस व रत्नागिरी-देवरुख मार्गावर या गाड्या धावल्या. मात्र, अद्यापही रत्नागिरी शहर विभाग बंद असून शनिवारी एकही फेरी सुटली नाही. शनिवारपयर्र्त 578 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर 3,131 कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत.









