ब्राझील स्ट्रेनचा शिरकाव; आरटीपीसीआर अनिवार्य
रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा ब्राझिल स्ट्रेन विदर्भातून राज्यात पसरला आहे. तो थेट शरीरातील फुफ्फुसावर परिणाम करतो. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर गंभीर परिणाम होतात. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी वाहतुकीवरही निर्बंध आणले आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठी आजपासून पोलिसांकडुन इ-पास सक्तीचे करण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा जिल्ह्यात येणार्यांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, जिल्हा प्रशासनाने 3 हजार 052 बेड उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा कोविड रुग्णालय 549, कोविड हेल्थ केअर सेंटर 574, सीसी (सौम्य रुग्ण असलेले) 1 हजार 884 एवढे बेड उपलब्ध आहेत. तसेच 73 ऑक्सिजन बेड आहेत. रत्नागिरीचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू झाला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. अन्य पाच ठिकाणीही ऑक्सिजन सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर आहे. 50 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचा प्लॅन्टही लवकरच सुरू केला जाणार आहे. जिल्ह्यात रुग्णवाहिकेचा प्रश्न होता, मात्र तो खनिकर्म विभागाकडुन खरेदी केल्या जात आहेत. त्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आठ दिवसात खरेदी प्रक्रिया पुर्ण होईल. तसेच नवीन 25 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. ई-पास सेवा आजपासून सुरू केली आहे. तसेच मुंबईहुन येणार्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. 72 तासापुर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.









