Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात

अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात

गुहागर:- गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत केला असून, एका आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.

2 जून रोजी मध्यरात्री गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री. हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा अज्ञात इसमाने कडी-कोयंडा उचकटून उघडला. गाभाऱ्यात प्रवेश करून तेथे ठेवलेली लाकडी दानपेटी चोरून नेल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली. या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी तात्काळ एक पथक नेमले. गोपनीय माहिती आणि मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात आला. घटना घडल्यापासून अवघ्या ४ तासांतच सौरभ संतोष कदम, रा. मळण रोड, श्रृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, त्याने चोरून नेलेला १००% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या ४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या मंदिर चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुजीत सोनावणे, म.पो.ना/२०७४ स्वामिनी नाटेकर, पोकॉ/१९६ वैभव चौगले, पोकॉ/२७१ प्रतिक रहाटे, पोकॉ/१२७७ प्रथमेश कदम, पोकॉ/७७९ निखील पाटील आणि म.पोकॉ/१४५३ सिमा मोरे यांनी पार पाडली.