Friday, July 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

रत्नागिरी:- अकरावीत शिकणाऱ्या मंडणगड तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. दीपक अंकुश गर्जे (वय ४२) असे त्या संशयित शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनी आजीचा मोबाईल सांभाळत होती. शाळेतील अभ्यास, पालकसभा आदी संदर्भातील माहिती शिक्षकाकडून मोबाईलवर पाठवली जात होती; मात्र, ४ ते ७ जुलै या कालावधीत संबंधित शिक्षकाने अयोग्य संदेश पाठवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भरत धुमाळ अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, मंडणगड तालुक्याच्यावतीने मंगळवारी (ता. १४) निवेदन पोलिसांना देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक, तालुका सरचिटणीस अॅड. सुशील दळवी, शहराध्यक्ष आनंद नारकर आदी उपस्थित होते.