पतीवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
संगमेश्वर:- अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय संशयित आरोपी पतीविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे १६ दिवसांची असून ती १६ आठवड्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी रोहित अशोक भुटिया (वय २२, मूळ रा. दिवळिया, जि. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या रा. रत्नागिरी) हे एकाच समाजातील आहेत. माहे डिसेंबर २०२५ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील गणेशआळी बाजारपेठ, गणपती मंदिराशेजारी राहत्या घरात या दोघांचा बालविवाह पार पडला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही संशयित आरोपीने तिच्या संमतीविना वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
भीतीपोटी आधी पोलिसांना दिली खोटी माहिती सदर पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. यापूर्वी दिनांक १३ मे २०२६ रोजी गुजरात राज्यातील लकतर पोलीस ठाणे येथे या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी पीडितेने तिचे लग्न आणि शारीरिक संबंध गुजरातमध्येच झाल्याचा खोटा जबाब दिला होता. परंतु, तिच्या भावाने आणि मावशीने समजूत काढल्यानंतर तिने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात खरा प्रकार कथन केला.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(i), ६४(२)(m), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो – २०१२) चे कलम ४, ६, ८ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावीत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









