अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना कोठडी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने शनिवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४, दोन्ही राहणार राजिवडा, रत्नागिरी) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडित अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केले होते. पीडित बालक अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती. मात्र, आरोपींनी या निंदनीय कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

गुरुवार, १२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ दिसून आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, कारण व्हिडिओतील बालक त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींची रवानगी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत