चार वाहनांना दंडाची नोटीस
रत्नागिरी:- बेकायदेशीर गौण खनिजची वाहतु करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध महसुल विभागाने मोहिम आखली आहे. तालु्क्यातील निवळी ते गणपतीपुळे मार्गावर कळा दगड, जांभा दगड, पावडरीची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केली. यावेळी चार वाहनधारकांकडे वाहतुक पास नसल्याचे आढळून आले. ही वाहने ताब्यात घेऊन त्यांना १ लाख ते ३१हजारापर्यंतच्या दंडात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.
रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव हे पीक कापणी प्रयोगासाठी तालुक्यातील खालगांवला जात होते. त्यावेळी त्यांनी निवळी ते गणपतीपुळे रस्त्यावर एका हॉटेलच्या ठिकाणी ३ वाहने (२ काळा दगड आणी १ डस्ट- पावडर) उभी असलेली आढळली. तहसीलदार श्री. जाधव यांनी सबंधीत वाहन चालकांकडे वाहतुक पासबाबत विचारणा केली. मात्र तिन्ही वाहनांकडे पास नसल्याचे वाहन चालकांनी सांगितले. त्यादरम्यान आणखीन एक जांभा दगड घेऊन जाणारे वाहन यांनी रस्त्यावर अडवुन पासबाबत विचारणा केली. या वाहनाकडे सुध्दा पास नसल्याचे वाहन चालक यांनी सांगितले. तहसीलदार श्री. जाधव यांनी निवासी नायब तहसीलदार श्री. मंचेकर, मंडळ अधिकारी श्री पाटील, तलाठी करबुडे श्री. चव्हाण आणि महसुल सहायक अमोल कांबळे यांना या ठिकाणी बोलावुन पुढील कारवाईचे आदेश दिले.
बेकायदेशीर विना वाहतुक पास गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर वाहने ताब्यात घेऊन तलाठी करबुडे, कोतवाल करबुडे आणि पोलिस पाटील करबुडे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. अनधिकृत गौण खनिज वाहतुक करणार्या वाहनांना दंडाची नोटीस दिली आहे. तहसीलदार शशिकांत जाधव, निवासी नायब तहसीलदार श्री मंचेकर, मंडळ अधिकारी तरवळ श्री. पाटील, तलाठी करबुडे श्री. चव्हाण, महसुल सहायक अमोल कांबळे, कोतवाल करबुडे आणि वाहन चालक श्री. डिचोलकर यांनी ही कारवाईकेली.