हापूसचे दर चढेच; डझनाला तीनशेचा भाव
रत्नागिरी:- यंदा हापूस आंबा परिपक्व झाला असला तरी वधारलेल्या दरांमुळे सध्या स्थानिक खवय्यांना आपल्या हौसेला मुरड घालावी लागत आहे. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया हापूसच्या आमरसावर ताव मारून साजरी करणे दुर्मिळच आहेे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पुरणपोळीचे सुग्रास जेवण व आमरसाच्या पंगतीची सुरवात खर्या अर्थाने याच दिवसापासून होते. परंतु, यंदा सणासुदीला पण पुरेशा प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध होणार नसल्याने यंदा बदाम, पायरी लालबाग, केशरवरच हौस भागवण्याची वेळ आंबाप्रेमींवर येणार आहे. स्थानिक बाजारपेठेत आंबा माफक प्रमाणात येत आहे. हापूसचे दर सध्या आवाक्याबाहेर असल्याने बाहेरील आंबा खिशाला मुरड घालून विकत घ्यावा लागत आहे.
हापूसला मध्यात अवकाळी पावसाने गाठले. याचा देखील हापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे. हवामान बदल आणि पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने शेतकर्यांनी वेळेआधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते. त्यामुळे दरात घसरण झाली होती. परंतु, बाजारात पुन्हा हापूसची आवक रोडावली असून, दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या आंब्याचे दर चढे आहेत, पण आवक जशी वाढेल तसे दर कमी होण्याचे संकेत विक्रेत्यांकडून दिले जात आहेत.