अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- शहराच्या काँग्रेसभवन परिसरात असणाऱ्या लॉजवरून ५ लाख रूपयांचा ९९ ग्रॅम ‘एमडी’ अंमली पदार्थ पोलिसानी मंगळवारी जप्त केला. या गुन्हातील संशियतांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

शियाद एके ( २५ ) व नजब मोयटू नौफल ( २३ , रा. दोन्ही केरळ ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भोसले व भालेकर हे शहरात पेट्रोलिंग करत होते. रहाटाघर बसस्थानक परिसरात दोघे तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यानुसार पोलिसांनी या तरुणांची चौकशी करण्यास सुरूवात केली. मात्र दोघांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे काही तरी गडबड असल्याचा संशय बळावला.

 या घटनेची माहिती शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी यांना देण्यात आली . त्यानुसार चौधरी यांनी संशयित तरूण राहत असलेल्या लॉजवर छापा मारला. यावेळी संशयितांच्या बॅगमध्ये ९९ ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. बाजारभावानुसार या अंमली पदार्थाची किमंत ५ लाख रूपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हे तरूण दिल्ली वरून केरळ याठिकाणी जात होते. तर सोमवारी सायंकाळीच हे दोन्ही तरूण लॉजवर थांबले होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान हे तरूण दिल्ली येथून केरळ याठिकाणी जात असताना रत्नागिरी येथे थांबण्याचे काय कारण होते. रत्नागिरी मध्ये महागडा समजला जाणारा एमडी हा अंमली पदार्थ कुणी खरेदी करणार होते का अथवा रत्नागिरीमधून कुणी हा पदार्थ त्यांना दिला. याबाबत काहीही पोलिसांकडून सांगण्यात आले नाही. अंमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरिक्षक महाले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक हरचकर पोलीस हवालदार बगड़ यांनी केली होती.