संगमेश्वर:- संगमेश्वर परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अंञवली मालपवाडी येथील मोकळ्या जागेत गांजासदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी पहाटे १२.४५ च्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना अञवली मालपवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत काही हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी संशयावरून तेथे पाहणी केली असता, दिपेश छाया कदम (वय २५, रा. कसबा चांभार मोहल्ला) आणि माज अब्दुल पटेल (वय २०, रा. कसबा उभा मोहल्ला) हे दोघे तरुण अमली पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य जवळ बाळगून गांजासदृश्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आले.
घटनास्थळी आरोपींना अमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले असून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल सतिश शांताराम कोलगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस.ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २७ आणि २९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत असून, परिसरातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे वाढते सेवन चिंतेचा विषय ठरत आहे.









