रत्नागिरी:-रत्नागिरीतील सेक्स रॅकेटचा तपास महत्वाच्या टप्प्यावर आला असून पोलिसांच्या हाती सीडीआर रिपोर्ट लागला आहे. त्यामुळे अनेकांचे पितळं उघडे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यातील संशयित आरोपी महिला ही यापूर्वी ४ वर्षे रत्नागिरीत एका हॉटेलमध्ये कामाला होती व त्याच ठिकाणी ती राहत होती. त्यातूनच ती देहविक्री करणार्या मुलींच्या संपर्कात आली आणि त्यातून सेक्सस्कॅण्डलसारखे प्रकार सुरू झाले. दरम्यान, अटकेतील संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ केली आहे.
शहरातील ओसवालनगर परिसरात सेक्सस्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. मुंबईची पोरगी, पुरवठादार सोलापूर, कराडचे हे कसे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. या महिलेला स्थानिक मदतगार असावा अशी चर्चादेखील होती. मात्र या गोष्टी पोलीस तपासात उघड होणार आहेत.
यातील संशयित आरोपी महिला ही यापूर्वी ४ वर्षे रत्नागिरीतील एका हॉटेलमध्ये कामाला होती. त्यातून तिने या ठिकाणी ओळखी निर्माण केल्या होत्या. अनेकांचे कॉन्टॅक्ट मिळवले होते. मात्र ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे नाव मात्र तिने अद्याप पोलिसांना सांगितले नाही.
रत्नागिरी सोडून गेल्यानंतर ती महिला देहविक्री करणार्या मुलींच्या संपर्कात आली होती. त्यातून तिने सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरू केला. पुणे, सांगलीसह ती रत्नागिरीत येऊन पोहोचली होती.
रत्नागिरीत ती महिला अनेक वर्षे येत जात आहे. संपर्क करून मुलींची माहिती तिच्याकडून गिर्हाईकांना दिली जात होती आणि व्यवहार ठरल्यानंतर ती मुली घेऊन रत्नागिरीत येत होती. यापूर्वी ती हॉटेलमध्येदेखील मुली घेऊन उतरल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, लॉकडाऊन सुरू होताच तिचा हा व्यवसाय थांबला होता.
२२ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर यातील संशयित आरोपी पद्मिनबाई हिचा व्यवसाय बंद झाला होता. ८ महिन्यानंतर पुन्हा तिने व्यवसायाला सुरूवात केली. नोव्हेंबरपासून ती पुन्हा रत्नागिरीत येऊ लागली. मात्र ज्यावेळी तिने रूम भाड्याने घ्यायचे ठरवले त्यानुसार रूम भाड्याने घेतला आणि व्यवसायाला पुन्हा सुरूवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संशयित महिलेने रत्नागिरीत देहविक्री करण्यासाठी बाहेरून मुली आणल्या होत्या. अवघ्या २ महिन्यात २५ ते ३० मुली ती रत्नागिरीत घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी साक्षीदार गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत त्याची पाळेमुळेच खोदून काढण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी संशयित मुलीच्या संपर्कात कोण-कोण होतं याची माहिती व नंबर मिळवण्यासाठी पोलिसांनी त्या महिलेच्या मोबाईलचा सीडीआर मागवला होता. नुकताच पोलिसांना हा सीडीआर मिळाला आहे.
पोलिसांना सीडीआर मिळाल्याने पोलिसांचे निम्मे काम हलके झाले आहे. आता सीडीआरनुसार संपर्कात असलेल्या मंडळींची पोलीस स्टेशन वारी सुरू होणार आहे. १ वर्षांचा सीडीआर पोलिसांनी मागवला असून १ वर्षात कितीजणांचा नंबर लागला हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, यातील संशयित दोन्ही आरोपींची १ मार्च रोजी पोलीस कोठडीची मुदत संपताच त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संशयित आरोपींच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत दोन्ही संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ केली आहे.









