ओसवाल नगर सेक्स रॅकेट
रत्नागिरी:- रत्नागिरीतील ओसवाल नगर परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. कॉन्टॅक्ट लिस्टमधील तब्बल ३३५ जणांची नावे पोलिसांच्या यादीवर आल्याची माहिती पुढे आली असून रत्नागिरीतील काही आंबटशौकिनांना चांगलाच दणका मिळणार आहेत. दरम्यान, अटकेतील पद्मनीबाई तुकाराम बादलवाड व शिवाजी आनंदराव पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील ‘तो मी नव्हेच’ म्हणणारे नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच तब्बल ३३५ जणांची कॉन्टॅक लिस्ट पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईनंतर काही आंबटशौकिनांचे धाबे दणाणले आहेत.
ओसवाल नगर येथील जो बंगला भाड्याने घेतला होता त्याचे डिपॉझिट यापूर्वीच संबंधितांनी दिले होते. मात्र त्याचे करारपत्र व्हायचे होते. कोणते कारण सांगून हा बंगला भाड्याने घेतला याबाबतची माहिती अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही.
अटकेतील महिलेचा मुंबई, पुणे अशा ठिकाणी दांडगा संपर्क होता. पुण्यात तिने २ वर्षे सेक्स रॅकेट चालवले. त्यामुळे रत्नागिरीत मागणीनुसार सेक्स रॅकेटसाठी मुली पुरवल्या जात होत्या. सर्रास मुंबई, पुणे आणि सांगली येथून मुली आणल्या जात होत्या अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे.