रत्नागिरी:-पत्नीचा पदर धरून तिला रस्त्याने फरफटत ओढत नेत तिच्या डोक्यात लाकूड मारून तिला ठार मारल्याप्रकरणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एम.क्यु. एस.एम. शेख यांनी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ९ ऑक्टोबर २०१८ रोजी जाकादेवी तळी, निवसर येथे घडली होती.
कौटुंबिक वादातून पत्नीला भर रस्त्यात फरफटत नेत तिच्या डोक्यात लाकडाचा दांडा मारून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीने आईचा जीव वाचावा यासाठी गावात धाव घेतली. मात्र बापाने आईवर हल्ला करून तिला जीवे मारले होते.
याप्रकरणी रूपाली गंगाराम धाडवे (वय १८) हिने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीचा खून केल्याप्रकरणी गंगाराम लक्ष्मण धाडवे यांच्याविरोधात भा.दं.वि.क. ३०२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच त्यावर अंतिम सुनावणी होऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांनी यातील आरोपी गंगाराम धाडवे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर ५ हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरिता हिची मुलगी रूपाली व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवींद्र मेस्त्री यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिले तर या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी केला होता. पैरवी अधिकारी म्हणून पो.कॉ. नरेश कदम यांनी काम पाहिले.