हाताला चावा घेऊन आरोपी पळाला; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर संशयिताने हल्ला केला. दोघांच्या हाताचा चावा घेवून हेमंत पाडुरंग देसाई (वय २९ ,रा.कांदिवली) हा फरार झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता उद्यमनगर येथे हि घटना घडली. याबाबत शहर पोलीस स्थानकात हेमंत देसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एका गुन्ह्यात हेमंत देसाई पोलीसांना हवा होता. त्याच्यावर यापुर्वी विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने गुन्हे केल्याच्या शक्यतेने तो पोलीसांना हवा होता.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हेमंत देसाई हा उद्यमनगर येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रविण खांबे, दत्तात्रेय कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी उद्यमनगर येथे गेले होते. पोलीसांना पाहिल्यानंतर हेमंतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी हेमंतने दोन्ही कर्मचाऱ्यांच्या हाताला चावा घेवून तेथून पळ काढला. दोन कर्मचार्यांना चावून हेमंत पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर, ग्रामीण पोलीसांची पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. कर्मचार्यांना चावून पळणार्या हेमंत देसाई विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









