रत्नागिरी:- तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. दुपारपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडणे पसंत केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी 67 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीत 90 हजार 584 एकुण मतदार आहेत. त्यातील 46 हजार 503 महिला तर 44 हजार 071 पुुरुष मतदार आहेत. सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत मतदारांचा प्रतिसाद कमी होता. 13 हजार 566 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अवघ्या 15 टक्केच मतदारांनी बाहेर पडणे पसंत केले. सकाळच्या सत्रात पुरुष वर्गाकडून मतदानाला प्राधान्य दिले होते. बहूतांश महिला वर्ग सकाळची कामे आटपून 10 वाजल्यानंतर मतदानासाठी बाहेर पडताना दिसत होते. त्यानंतर 11.30 वाजेपर्यंत 16 हजार 688 मतदान झाले. सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत 33 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा ओघ कमी झाला होता. त्यानंतर सायंकाळी 4 ते 5.30 या कालावधीत मतदानासाठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 67 टक्के मतदान झाल्याचा अंदाज होता.
ग्रामपंचायतीत राजकीय पक्षांची चिन्हे वापरली जात नसली तरीही तळागाळातील कार्यकर्ते मजबुत ठेवण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपल्या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार निवडुन आणण्यासाठी काही कार्यकर्ते बुथवर कार्यरत होते. तालुक्यातील नाचणे, मिरजोळे, गोळप, गावखडी, पावस यासह वाटद-खंडाळा, वरवडे, कोतवडे येथील ग्रामपंचायतींकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. वाटद-खंडाळ्यासारख्या काही ग्रामपंचायतीत प्रभाग रचना बदलल्याचा परिणाम झालेला असून तिथे दुपारपर्यंत सुमारे 70 टक्के मतदान झाले होते.









