खाऊगल्लीतील व्यवसायावर कडक निर्बंध

रनप सभेत निर्णय; काही वडापाव गाड्या सुरू करणार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील स्वा. सावरकर नाट्यगृहामागील खाऊगल्लीत व्यवसाय करणार्‍यांवर काही निर्बंध लादण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा शासकीय रूग्णालयात येणार्‍या रूग्णांच्या गरिब नातेवाईकांना वडापावची सोय व्हावी यासाठी रूग्णालयाबाहेर प्रवेशद्वारावर तसेच मध्यवर्ती एसटी स्टँडसमोर काही हातगाड्या सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांचे एकमत झाले.

नाट्यगृहामागील खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेसमोर ही खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. या विषयावर चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष तथा पिठासन अधिकारी प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी कोणते निर्बंध असतील याची माहिती दिली. यामध्ये खाऊगल्लीतील प्रत्येक व्यावसायिकाला ओळखपत्र, हातगाडी नंबर देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.

खाऊगल्लीतील हातगाडी मालकाने ती कोणाला भाड्याने दिली आहे का? भाड्याने दिली असेल तर ती गाडी तेथे व्यवसाय करण्यास पात्र नसेल असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. यावर सर्वपक्षीय सदस्यांनी सहमती दर्शवली. एसटी स्टँडसमोर आणि जिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गरिबांची सोय व्हावी यासाठी कडक निर्बंध घालून काही वडापाव गाड्या सुरू करण्याबाबत विचार केला जाईल. याबाबत आरोग्य समिती सभापतींनी योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी केल्या. या सर्व ठिकाणी स्वच्छतेची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही नगराध्यक्षांनी स्पष्टपणे बजावले. यापुढे नगरसेवकांची बदनामी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची विनंती भाजपा गटप्रमुख समीर तिवरेकर यांनी केली.

नागरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2016 व पर्यावरण विषयक बाबीचे अनुपालन न झाल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराने राज्यातील बहुतांश नगरपरिषदांना दंड ठोठावला आहे. रत्नागिरी नगर परिषदेला याप्रकरणी 8 लाख रूपये दंड झाला असून, तो भरण्याबाबतचा ठराव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत झाला.

अपंग लाभार्थींना दिली जाणारी आर्थिक मदत योग्य रितीने वापरली जात आहे की नाही याची खातरजमा करण्याचा निर्णयही सभेने घेतला. अत्यावश्यक वस्तू, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आदींसाठी रनपकडून आर्थिक मदत केली जाते. 10 लाख 20 हजार रूपये या कामी खर्च करण्यात मंजुरी देण्यात आली. परंतु, ही रक्कम लाभार्थींकडून प्रस्तावाप्रमाणे खर्च होतेय की नाही याचा सर्व्हे करावा, अशा सूचना नगराध्यक्षांनी यावेळी केल्या.

नवनिर्वाचित सभापती निमेश नायर, विकास पाटील, नगरसेविका स्मितल पावसकर, गटप्रमुख समीर तिवरेकर यांनी काही विषयांवर चर्चा केली. पाणी समितीच्या नूतन सभापती दिशा साळवी यांनी शहरातील पाणी पुरवठ्यातील व्यत्ययाची माहिती दिली. नवीन नळपाणी योजनेतील खोदाईमुळे अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटून पाणी पुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर जुना अग्निशामक वरचेवर बिघडत असल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यातही अडचण येते. शहरवासियांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन पाणी योजना होईपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन टँकर भाड्याने घेण्याची सूचना सभापती दिशा साळवी यांनी केली. पिठासन अधिकार्‍यांनी याबाबत पाणी समितीने योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या आहेत.