रत्नागिरी:- शहरातील गोखलेनाका येथील मिनार बीयरबार शॉपीमध्ये रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एक तरूण जखमी झाला असून त्याच्याकडून ३५ हजार रूपयांची रोकड संशयित आरोपी यांनी हिसकावून नेली. मुजफ्फर मजीद फणसोपकर (३९, रा. मिरकरवाडा रत्नागिरी ) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी मुजफ्फर यांनी शहर पोलिसांत ३ संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सुफियान, अण्णा काशा, तन्वीर जीवाजी (रा. मिरकरवाडा) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व संशयित आरोपी हे २२ रोजी रात्री रत्नागिरी बाजारपेठेतील मिनार बियरबार येथे दारू पिण्यासाठी बसले होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुजफ्फर व सुफियान यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा राग मनात ठेवून सूफियान, अण्णा काशा व तन्वीर यांनी मुजफ्फर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच मोठ्याने आरडाओरडा केला. दरम्यान यावेळी अण्णा काशा याने मुजफ्फर यांच्याकडील ३५ हजार रूपयांची रोकड हिसकावून नेली. अशी तक्रार मुजफ्फर याने शहर पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.









