जिल्ह्यात जलसंपदाच्या धरणात नौका विहार प्रकल्प

रत्नागिरी:- जलसंपदा विभागाने बांधलेल्या जलाशयात नौकाविहाराचा आनंद पर्यटकांना घेता यावा यासाठी निवे, मुचकुंदी, नातूवाडी, अर्जुना या धरणाच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

पिण्याच्या पाण्यासह सिंचनात वाढ व्हावी, यासाठी जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात 68 लघु, मध्यम प्रकल्प उभारले आहेत. यामध्ये पाटबंधारे मंडळाचे 49 लघु प्रकल्प तर 3 मध्यम प्रकल्प आहेत. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून पर्यटन वाढीला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार मिळावा आणि पाटबंधारे विकास महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून जलाशयात नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या प्रकल्पात नौका विहाराबरोबरच पॅरासेलिंग या साहसी खेळाचीहि परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. प्रकल्पाच्या बाजूला हॉटेल, लॉजिंग व्यवसाय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल.

कोकणात येणार्‍या पर्यटकांसाठी किनारे, मंदिरे वगळता अन्य आकर्षित ठिकाणे नाहीत. मोठे पाटबंधारे प्रकल्प नसले तरीही लघु प्रकल्पांमध्ये नौका विहाराची व्यवस्था केली गेली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. हे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पावले उचलली आहेत. लघु प्रकल्पातून सिंचनासाठी एक टक्काच पाण्याचा वापर होतो. पिण्याच्या पाण्यातून जलसंपदा विभागाला मिळणारे उत्पन्नही अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासनाकडून प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट्स, सुस्थितीत असलेली बोट असणे आवश्यक आहे. बोट चालविणारा चालक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.