आमदार लाड, आमदार चव्हाण यांचा शेतीशी संबंध काय?

पालकमंत्री ॲड. परब; शेतकऱ्यांची काळजी घ्यायला सरकार समर्थ 

रत्नागिरी:- शेतकर्‍यांची काळजी घ्यायला सरकार समर्थ आहे. शेतीवर चर्चा करायला आलेल्या आ.प्रसाद लाड, आ.रविंद्र चव्हाण यांचा शेतीशी काय संबध ? शेती-गटशेती त्यांना माहिती आहे का ? शेतकऱ्यांच्या  व्यथा आम्हाला माहिती आहे. शेतकर्‍यांबाबत आम्ही राजकारण करत नाही. ती आमची सवय नाही.आम्ही राजकिय मतभेद करुन मदत करत नाही. सत्ता नसल्याने भाजपा नेत्यांना नैराश्य आले आहे. त्यातूनच ते टिका करत असल्याचा आरोप पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी केला. 

ना. परब यांनी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, निसर्ग चक्रीवादळातील मदत वाटपचा प्रश्न, अवकाळी पाऊस आणि  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या जागेबाबत आढावा बैठक घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचखरी येथील गटशेती करणाऱ्या ७६ शेतकर्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच अवकाळी पावसाचा फटकाही त्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी उपस्थित राहत नाहीत, अशी टिका भाजप आमदारांनी केली होती. यावर बोलताना पालकमंत्री परब म्हणाले की, राजकारणासाठी आम्ही राजकारण करीत नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी निश्चित काम करणार असल्याचे ना. परब यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड यांचा शेतीशी काय संबंध असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना, राजकीय हेतूने आरोप करणार्यांना आम्ही उत्तरे देत नाही. विरोधी पक्षाच्या पदाधिकार्यांना भेटू नका असा कोणताही सल्ला किंवा आदेश प्रशासन व त्यातील अधिकार्यांना दिलेला नसल्याचे ॲड. परब यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील ९ कोटी ५८ लाखांचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाकडून ८ कोटी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. दिवाळीपुर्वी शेतकर्यांना मदत दिली जाईल. प्रत्येक शेतकर्‍यांचे बॅक खाते क्रमांक प्रशासनाकडे आहेत. त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे ना.परब यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना आजारावर चांगल्या पध्दतीने मात करण्यात यश आले आहे. सध्या जगभर दुसरी लाट पसरत आहे. अशी लाट आल्यास, आरोग्य यंत्रणा सज्ज असावी म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्ण हाताळण्याची यंत्रणा कमी करण्यात येऊ नये, सध्या असलेली तयारी तशीच ठेवण्यात यावी अशीही सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु करण्यात आली. ऑक्सिजन बेडची सुविधा मोठ्याप्रमाणात उभारण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी ना. परब यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनासाठी आतापर्यंत १० कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.