जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; पारा घसरला

रत्नागिरी:- राज्यात कोरडे हवामान झाले आहे. त्यामुळे वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाली असून उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्यांचे प्रवाहही सुरू झाले आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढत जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

यंदा ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाले आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढत जाऊन कमाल तापमानाची वाढ होत असते. त्यामुळे ऑक्टोबर हीट ही चांगलीच जाणवत असल्याची स्थिती असते. मात्र, चालू वर्षी ऑक्टोबर हीट न जाणवता नोव्हेंबरच्या सुरूवातीपासून थंडीची चाहूल लागली आहे. बुधवारी तर रत्नागिरी येथे 32.0 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. 

पावसाच्या हंगामातील चार महिन्यांचा काळ संपल्यानंतर ऑक्टोबरच्या साधारणतः: दुसऱ्या आठवड्यानंतर ढगाळ स्थिती दूर होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतो. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस किंवा त्यापुढेही जातो. हा कालावधी ‘ऑक्टोबर हीट’ म्हणून परिचित आहे. यंदा जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा मुख्य कालावधी संपल्यानंतर राज्यात ढगाळ स्थिती कायम होती.परिणामी ऑक्टोबर हीट वगळून राज्याला थंडीची चाहूल लागली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.