रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या प्रौढाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २२ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश सुधाकर सुर्वे (वय ५१) यांनी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून कार्यालयाच्या प्रवेशद्वारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला होता.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शैलेश यांचे गवळीवाडा येथील जमीन व्यवहारासंदर्भात वादविवाद झाले होते. त्यातूनच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोहेकॉ महेश कुबडे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शैलेश सुधाकर सुर्वे याच्याविरोधात भादंविक ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पो. ना. जाधव करीत आहेत.