Thursday, May 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने ६ कोटींचे नुकसान

जिल्ह्यात मुसळधार पावसाने ६ कोटींचे नुकसान

जोर ओसरला; घरे, दुकाने व सार्वजनिक मालमत्तांची हानी

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरीतील नद्यांच्या पुराचे पाणी ओसरले आहे. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ६ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून अजून पंचनाने सुरू असल्यामुळे काही दिवसात नेमके नुकसान किती झाले, हे स्पष्ट होणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. मागील दोन-तीन दिवस तर जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी सात नद्या या इशारा पातळीच्या वरती वाहत होत्या. खेड, चिपळूण, राजापूरसह संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मागील दोन दिवस पुराचे पाणी शहर परिसरात घुसलेले होते. यातच जोरदार वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, संरक्षक भिंती कोसाळणे, घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणलाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

पूरस्थिती व जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता; मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांनी विशेष प्रयत्न करत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. चिपळूण, संगमेश्वर, मंडणगडमध्ये महावितरणच्या ग्राहकांना सर्वाधिक फटका बसला. संगमेश्वरमध्ये काही गावात जवळपास 22 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. चिपळूमध्येही मंगळवार व बुधवारी वीजपुरवठा खंडित होता; मात्र महावितरण कर्मचारी त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करत होते. रत्नागिरी तालुक्यालाही या पावसाचा चांगलाच फटका बसला. काजरघाटी पोमेंडीखुर्द येथे रस्त्यावर झाड पडले होते. ते बांधकामच्या कर्मचार्‍यांनी बाजूला केले. बावनदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे निवळी येथील सहा घरांमधील नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले होते. जयगड बौद्धवाडी येथील अलका सोवळे यांच्या घरावर झाड पडून नुकसान, देवूड पिंपळवाडी येथे रमेश घाणेकर यांच्या गोठ्याचे नुकसान, खरवते येथे पांडुरंग तळेकर यांच्या घराजवळील बांध कोसळून 35 हजाराचे नुकसान, गुहागर तालुक्यातील आबलोली शिर्केवाडी येथे दरड कोसळली यात आशिष शिर्के यांचे नुकसान झाले आहे. मंडणगड नारायणगाव येथे विजया घोंगळ यांच्या घरावर दगड कोसळून भिंत व पत्र्याचे नुकसान झाले आहे.

कालपर्यंत साडेपाच कोटींची हानी

गेल्या सहा दिवसात जिल्ह्यात घरे, दुकाने व सार्वजनिक मालमत्तांची मोठी हानी झाली आहे. 19 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 5 कोटी 52 लाख 91 हजार 448 लाख नुकसानीची नोंद झाली आहे. यात मागील दोन-तीन दिवसांचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे हा आकडा आता सहा कोटीच्याही पुढे जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 374 बाधित घरे असून, 1 कोटी 17 लाख 48 हजाराहून अधिकचे नुकसान नोंदवले गेले आहे तर 71 गोठ्यांचे 24 लाख 60 हजाराचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे आल्यानंतर हा आकडा आणखी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.