रत्नागिरी:- दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या करबुडे येथील ५५ वर्षीय प्रौढाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय कृष्णा मोहिते (वय ५५, रा. करबुडे, ता. जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कृष्णा मोहिते यांनी ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरासमोर दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने प्रथमोपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच दिवशी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते.
कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना ५ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. कुणाल भांडुरे यांनी दिलेल्या वैद्यकीय-कायदेशीर अहवालाद्वारे (एमएलसी) देण्यात आली. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२२ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू क्रमांक १०६/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.









