Thursday, November 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी देवरुख येथे बंद घर फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

देवरुख येथे बंद घर फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीकच्या बागवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा मागील दरवाजा उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगिता रवींद्र फेफडे (वय ४०, मूळ रा. शिवणे, सध्या रा. श्रीराम नारायण कदम यांच्या घरी भाड्याने, बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा पाठीमागील दरवाजा कोणत्यातरी कठीण हत्याराने उचकटून आत प्रवेश केला.

चोरट्याने घराच्या हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटाचे लॉकर तोडून आतील पत्र्याच्या डब्यात ठेवलेले ६० हजार रुपयांचा सोन्याचा हार, ८० हजार रुपयांचा १२ ग्रॅमचा सोन्याचा हार, २५ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, बाली, जोडवी, मासोळी, चांदीची वाटी, ब्रेसलेट आणि मनगट्या असे दागिने तसेच ५०० रुपयांच्या नोटा असलेली १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. १० नोव्हेंबर रोजी दुपारी याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(१), ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, देवरुख पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.