वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मोठी कारवाई
संगमेश्वर:- तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध महिला जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यू प्रकरणास आता मोठे वळण मिळाले आहे. वृद्ध सासूला लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सुनेला संगमेश्वर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. घटनेनंतर मागील काही दिवसांपासून लपून बसलेल्या संशयित महिलेला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५:३० च्या सुमारास नायरी येथील राहत्या घरी ९१ वर्षीय जुलेखा इसाक मोडक यांना मारहाण करण्यात आली होती. वृद्ध महिलेची देखभाल करावी लागत असल्याच्या तसेच त्यांना कुठेही फिरायला जाता येत नसल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांची सून नाशिरा अस्लम मोडक हिने संतापून त्यांच्यावर लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी हल्ला केला होता.
या अमानुष मारहाणीत वृद्धेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला तसेच उजव्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पीडितेची मुलगी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, ज्यानुसार सुनेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जुलेखा मोडक यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नायरी-फणसवणे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वृद्ध सासूची हत्या आणि मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यानंतर संशयित सून नाशिरा मोडक ही फरार झाली होती व पोलिसांना चकवा देत होती. पोलीस तिच्या सतत मागावर होते. नायरी येथील तिच्या घराची पाहणी केली असता, समोरच्या दरवाजाला कडी आणि मागच्या बाजूने कुलूप लावलेले दिसून आले.
संशयित महिला त्याच बंद घरात असल्याच्या पक्क्या संशयावरून बुधवारी पहाटेपासूनच संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने सूत्रे हालवली. हेड कॉन्स्टेबल विनय मनवल यांनी या परिसरावर बारीक नजर ठेवली. अखेर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल विनय मनवल, हेड कॉन्स्टेबल क्रांती सावंत आणि पोलीस हवालदार भोसले यांनी धडक कारवाई करत संशयित नाशिरा मोडक हिला ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ९१ वर्षांच्या वृद्धेच्या मारहाणीच्या तक्रारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता हत्येचा गुन्हा आणि सुनेच्या अटकेपर्यंत येऊन ठेपला आहे. वृद्धेच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, मारहाणीचा मृत्यूशी असलेला संबंध आणि त्यामागील इतर कारणांचा पोलीस कसून शोध घेत असून याद्वारे आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









