गुहागर:- तालुक्यातील गोणवली-कळेवाडी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास किंवा त्यापूर्वी घडली.
यशवंत महादेव कळे (वय ६७, रा. गोणवली कळेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत यशवंत कळे हे गोणवली येथील आपल्या राहत्या घरात असताना त्यांनी हॉलमधील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. शेजारी राहणारे समीर सुरेश कामेरकर यांना यशवंत कळे हे गळफास घेतलेल्या आणि मृत अवस्थेत दिसून आले.
या घटनेची माहिती समीर कामेरकर यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.









