Sunday, November 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून २४ लाखांचा गंडा

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून २४ लाखांचा गंडा

चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून फसवणूक

चिपळूण:- पोलिसांचा गणवेश परिधान करून आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत एका सायबर भामट्याने चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील ६५ वर्षीय डॉक्टरची तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांचा धाक दाखवत संबंधित डॉक्टरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास महादेव ओक (वय ६५, व्यवसायाने डॉक्टर, रा. बामणोली, डिंगणकरवाडी, ता. चिपळूण) यांना ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. संजय पिसे असे नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने पोलीस गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे ओक यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या नावावरील एअरटेल सिमकार्डविरोधात २० जणांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या बँक खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसारख्या आर्थिक गैरव्यवहारासाठी झाल्याचा आरोप करून त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली.

या कथित पोलीस कारवाईच्या दबावाखाली आणून संबंधित भामट्याने ओक यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने एकूण २३ लाख ९५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१९(२), २०४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय पिसे असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.