२४ तासांत चार बंगले फोडले, लाखोंचा ऐवज चोरीला
खेड:- खेड शहरालगतच्या वेरळ येथील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री समर्थ कृपा विश्व रो-हाउसेस’ परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २४ तासांच्या कालावधीत एकापाठोपाठ चार आलिशान बंगल्यांना लक्ष्य करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या परिसरात सलग घडलेल्या घरफोड्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेरळ येथील या सोसायटीत न्यायाधीश, नामांकित वकील, उद्योजक तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा परिसर सुरक्षित मानला जातो. मात्र, चोरट्यांनी याच भागाला लक्ष्य केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सोसायटीतील तीन बंगल्यांमध्ये प्रवेश करून मौल्यवान वस्तूंसह अन्य साहित्याची चोरी केली. या घटनेची माहिती समोर येत असतानाच सोमवारी पहाटे याच परिसरातील आणखी एका बंगल्यात चोरी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे नियोजनपूर्वक या घरफोड्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
चार बंगल्यांमध्ये झालेल्या या चोरीत नेमका किती रुपयांचा ऐवज लंपास झाला, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. चोरीला गेलेल्या वस्तूंची यादी आणि नुकसानीची एकूण रक्कम निश्चित झाल्यानंतरच या घटनेची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. मात्र, एकाच सोसायटीत अल्पावधीत चार घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
चोरट्यांनी बंगल्यांमध्ये प्रवेश कसा केला, चोरीनंतर पलायनासाठी कोणता मार्ग वापरला आणि या सर्व घटनांमागे एकाच टोळीचा सहभाग आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरट्यांनी यापूर्वी परिसराची पाहणी केली होती का, याचाही तपास होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करणे, रात्रीची पोलिस गस्त वाढवणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. सलग घडलेल्या या घरफोड्यांचा छडा लावून चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे आणि चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनांमुळे खेड शहरालगतच्या उच्चभ्रू वस्तीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.









