Sunday, October 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुवारबाव येथे पादचाऱ्याला दुचाकीची धडक; वृद्ध गंभीर जखमी

कुवारबाव येथे पादचाऱ्याला दुचाकीची धडक; वृद्ध गंभीर जखमी

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावर पाटबंधारे वसाहतीसमोर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका भरधाव सुझुकी ॲक्सेस दुचाकीने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७२ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून दुचाकीस्वारावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सरदार शाम रमेश खानविलकर (वय २८, सध्या रा. पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी, मूळ रा. राववाडी गोवीळ, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील सुझुकी ॲक्सेस दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीए ९०१७) घेऊन आरटीओ रस्त्याकडून कुवारबांव बाजारपेठेकडे जात होता. हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावरील पाटबंधारे वसाहतीसमोर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत त्याने उजव्या बाजूच्या साईडपट्टीवरून विरुद्ध दिशेने हयगयीने आणि बेदरकारपणे गाडी चालवली. त्याच वेळी कुवारबांव बाजूकडून पायी चालत येणारे अशोक सोनू पवार (वय ७२, रा. जागुस्ते कॉलनी, कुवारबांव, रत्नागिरी) यांना या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात अशोक पवार हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीस्वार स्वतःही किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र काशिनाथ खापरे (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार सरदार खानविलकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.