सावंतवाडी-सीएसएमटी एक्स्प्रेसमधील चोरीचा उलगडा
चिपळूण:- रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आणि नेरूळ युनिट गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून अटक केली. कृष्णकुमार पांडे (४०) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४८ लाख ३० हजार ७९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले. तांत्रिक तपास आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली येथे राहणारे रणजित चव्हाण (६२) ९ ऑक्टोबर रोजी कुटुंबासह सावंतवाडी – सीएसएमटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. चिपळूण रेल्वे स्थानकातून रेल्वेगाडीत चढल्यानंतर त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल असलेली तपकिरी रंगाची पर्स उशीखाली ठेवली होती. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. त्यावेळी चोराने पर्स लंपास केली. पनवेल रेल्वे स्थानकात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एसटीएफ आणि नेरूळ युनिट गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कृष्णकुमार पांडे हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एसटीएफचे पथक सतना येथे रवाना झाले. स्थानिक नागौद पोलिसांच्या मदतीने १३ ऑक्टोबर रोजी हरदुवा मोहल्ला परिसरातून कृष्णकुमारला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून मंगळसूत्र, सोन्याच्या मण्यांची माळ, राणीहार, तोडे, सोन्याच्या साखळ्या, सोन्याचे नाणे, लक्ष्मीहार, मोत्यांची नथ, ब्रेसलेट; तसेच आयफोन आणि पोको कंपनीचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाचे एकूण मूल्य ४८ लाख ३० हजार ७९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध यापूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









