Saturday, October 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वेरवली घटनेशी जुळतोय २०२२ मधील चोरीचा संदर्भ!

वेरवली घटनेशी जुळतोय २०२२ मधील चोरीचा संदर्भ!

संशयिताच्या अटकेनंतर लांजा पोलिसांकडे अर्जाद्वारे पुनर्तपासाची मागणी

लांजा:- लांजा येथील रहिवासी अभिजित हेमंत लाड यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी लांजा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना एक अर्ज देऊन, ६ जून २०२२ रोजी दाखल केलेल्या तक्रारीचा पुन्हा तपास करण्याची विनंती केली आहे. अर्जदार अभिजित लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ अनिरुद्ध हेमंत लाड यांनी ६ जून २०२२ रोजी दागिने गहाळ झाल्याबाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, नुकतीच वेरवली बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव परिसरात त्यांच्या जुन्या तक्रारीसारखीच एक नवीन आणि गंभीर घटना घडली आहे. लाडवाडी येथे एका ७६ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या नवीन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लांजा पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही नवीन घटना आणि आपल्या आईच्या वेळेस घडलेला प्रकार या दोन्ही प्रकरणांचे स्वरूप अत्यंत सारखे असल्याने, यापूर्वीच्या तक्रारीचा संदर्भ या घटनेशी जुळत असल्याचा दावा लाड यांनी केला आहे.

त्यामुळे संशयित व्यक्तीकडून जुन्या प्रकरणाचाही उलगडा होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी आपल्या २०२२ मधील तक्रारीचा पुन्हा एकदा सखोल तपास सुरू करावा, अशी नम्र विनंती अभिजित लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. आता या अर्जाची दखल घेऊन लांजा पोलीस जुन्या प्रकरणाचा पुर्नतपास कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.