Friday, October 23, 2026
spot_img
Home गुहागर अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

गुहागर वेळणेश्वर येथील घटना

गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने महाविद्यालयीन वर्तुळासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली पाटील ही वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती ओझरवाडी, वेळणेश्वर येथे सिताराम सोमा मोरे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास होती. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या खोलीतील पत्र्याच्या शेडला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ काही हालचाल न दिसल्याने ही बाब समोर आली असता ती मृत अवस्थेत आढळून आली.

या घटनेची माहिती घरमालक सिताराम मोरे यांनी तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. गुहागर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. अंजलीने टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले हे अद्याप समजू शकलेले नसून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.