Wednesday, October 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजातील वृद्ध महिलेच्या खूनाचा १२ तासांत छडा

लांजातील वृद्ध महिलेच्या खूनाचा १२ तासांत छडा

सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा जीव घेणाऱ्या कर्जबाजारी आरोपीला बेड्या

लांजा:- लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या निर्घृण खुनाचा आणि सोन्याचे दागिने जबरीने लुटल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. सोन्याच्या दागिन्यांची लूट करून दिशाभूल करण्यासाठी वृद्धेच्या हातात बनावट बांगड्या घालणाऱ्या आणि कर्जबाजारीपणामुळे हा भीषण गुन्हा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या आपल्या घरी एकट्या असल्याची संधी साधून अज्ञात मारेकऱ्याने घरात प्रवेश केला. त्याने वैशाली यांचा निर्घृण खून करून त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. चोरीचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने जाताना त्यांच्या हातात नकली बांगड्या अडकवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तीन स्वतंत्र तपास पथके तात्काळ रवाना करण्यात आली. गोपनीय माहिती, संशयितांची पडताळणी आणि सायबर-तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयाची सुई निश्चित केली. त्यानुसार घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर राहणारा संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता, डोक्यावर झालेल्या कर्जामुळेच आपण हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. या धडक कारवाईत पोलीस अधिकारी देवकन्या मैदाड, अमोद सरंगले, संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, संजय मारळकर, विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे व अतुल कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली असून, अवघ्या १२ तासांत खुनाची उकल करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.