Wednesday, October 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी आरे वारेत तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारणीवर एकमत

आरे वारेत तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारणीवर एकमत

ग्रामस्थांसोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

रत्‍नागिरी:- पर्यटनस्‍थळ असलेल्‍या आरेवारे येथे वनविभागाने कारवाई करुन अनेक वर्षापासून व्‍यवसाय करणार्‍या स्‍थानिकांवर बुलडोझर फिरवल्‍यामुळे उपासमारीची वेळ आली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्‍या मार्गदर्शनाखाली जि.प. सदस्‍य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्‍हाप यांनी आरेवारे समुद्रकिनारी या व्‍यावसायिकांची बैठक घेत तोडगा काढत, तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात स्‍टॉल उभारण्‍याची चर्चा करण्‍यात आली.

आरेवारे येथे काही स्‍थानिक व्‍यावसायिक अगदी आरेवारे पूल बांधण्‍याच्‍या वेळेपासून उदरनिर्वाहासाठी स्‍टॉल उभारुन व्‍यवसाय करीत होते. याभागात पर्यटन वाढीस लागल्‍यानंतर हळूहळू मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या बाजून वीसएक स्‍टॉल उभे राहिले. समुद्र किनारीही काही ग्रामस्‍थांनी स्‍टॉल उभारत पर्यटकांना सुविधा पुरवण्‍याच्‍या दृष्‍टीने पावले उचलली होती. वनविभागाकडे काही झालेल्‍या तक्रारीतून वनविभागाच्‍या अधिकार्‍यांनी थेट सर्वच स्‍टॉल जेसीबी लावून उध्‍वस्‍त केले. यात स्‍टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी काही ठिकाणी कठडे बांधल्‍याचे कारण देण्‍यात आले.

ऐन पर्यटन हंगामाच्‍या सुरुवातीलाच ही कारवाई झाल्‍यामुळे ग्रामस्‍थांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांचीही भेट काही ग्रामस्‍थांनी घेतली होती. यावेळी ना. सामंत यांनी वनविभागाच्‍या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. पालकमंत्री स्‍वत: या ठिकाणी जाऊन स्‍थानिक व्‍यावसायिकांशी चर्चा करणार होते.

पालकमंत्र्‍यांच्‍या सूचनेनुसार तालुकाप्रमुख आणि जि.प. सदस्‍य बाबू म्‍हाप, जि.प. सदस्‍या श्रीमती मोरे, पं.स. सदस्‍य परेश सावंत यांनी सोमवारी आरेवारे पुलानजीक वनविभागाने कारवाई केलेल्‍या स्‍टॉलधारकांची बैठक घेत, त्‍यांचे म्‍हणने ऐकून घेतले. याठिकाणी कारवाईपूर्वी सुरु असलेल्‍या स्‍टॉलधारकांनी तात्‍पूरत्‍या स्‍वरुपात पुन्‍हा व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी स्‍टॉल उभारावेत अशी चर्चा करण्‍यात आली.


येथील स्‍टॉलधारकांचे मत ऐकूण घेतले असून, 26जणांना तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात व्‍यवसाय सुरु करण्‍यास सांगण्‍यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत सिंधुरत्‍न मधून लवकरच स्‍टॉलधारकांना स्‍टॉल उभे करुन देण्‍याचे जाहीर केले आहे. यावर लवकरच कार्यवाही होणार आहे.
– बाबू म्‍हाप, शिवसेना तालुकाप्रमुख