कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टरची मदत
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार इंगलवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर यांच्यासोबत बुडालेली माहिरा जुनेद भाटकर अद्याप मिळून आलेली नाही. तिचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टगार्डच्या कमांडोंची तसेच हेलिकॉप्टरची मदत घेऊन शोधकार्य सुरू आहे.
या शोधमोहिमेत लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाटे पोलीस ठाण्यातील १० पोलीस अंमलदार, सागरी सुरक्षा विभागाचे १० होमगार्ड, रत्नागिरी पोलीस नौका विभागाचे जवान सहभागी झाले आहेत. तसेच शोधकार्यासाठी कायकिंग बोट आणि मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाचीही मदत घेतली जात आहे. बेपत्ता माहिरा जुनेद भाटकरचा शोध घेण्यासाठी पोलीस दल आणि विविध बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.









