Wednesday, October 14, 2026
spot_img
Home गुहागर गुहागर पालशेत येथे १२५ एकर जागेवर ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प

गुहागर पालशेत येथे १२५ एकर जागेवर ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

गुहागर:– कोकणच्या निसर्गसौंदर्याला चित्रपट पर्यटनाची जोड देऊन गुहागर तालुक्यातील पालशेतला चित्रपट निर्मितीचे केंद्र बनविण्याच्या दिशेने  राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. पालशेत येथील सुमारे १२५ एकर शासकीय जागेवर ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी मंत्रालयात घेतलेल्या एका बैठकीत दिले. प्रकल्पासाठी निधीचे पर्याय तपासून महिनाभरात प्रस्ताव सादर करण्याची मुदतही त्यांनी निश्चित केली आहे.

गुहागर आणि दापोली परिसरातील समुद्रकिनारे, निसर्गरम्य स्थळे आणि पर्यटनक्षमता चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी अनुकूल आहे.या भागात यापूर्वीही मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे.मात्र,आवश्यक परवानग्या आणि चित्रीकरणासाठीच्या सुविधा वेळेत उपलब्ध होत नसल्याने निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली आहे.

पालशेतसह वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा वापर करून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी विविध सूचना मांडल्या.त्यातही 

निधीसाठी एमटीडीसी-म्हाडाचा पर्याय

मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून प्रकल्प उभारण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली.एमटीडीसी सोबत संयुक्त उपक्रम राबविण्याचे नियोजन करतानाच चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी मिळविणे आणि त्यासाठी म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या प्रकल्पातून चित्रपट निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन व्यवसाय, स्थानिक सेवा आणि रोजगारनिर्मितीला हातभार लागू शकतो. मात्र, प्रकल्पाचे अंतिम स्वरूप, निधीची उपलब्धता, अंमलबजावणीची यंत्रणा आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.त्यामुळे महिनाभरात सादर होणाऱ्या प्रस्तावातून या बाबी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

प्रामुख्याने “फिल्म टूरिझम” प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यास चित्रीकरणासाठी येणारे निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यामुळे स्थानिक निवास, वाहतूक, खानपान आणि अन्य पर्यटनपूरक व्यवसायांना संधी मिळू शकते. स्थानिक तरुणांना तांत्रिक व सेवा क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे. मात्र, या संधींचे प्रत्यक्ष आर्थिक लाभात रूपांतर करण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य, पर्यावरणपूरक विकास आणि पारदर्शक प्रकल्प व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.

या बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.