Wednesday, October 21, 2026
spot_img
Home लांजा लांजा आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

लांजा आरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

लांजा:- तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय २८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. आजारपणाला कंटाळून त्याने विहिरीत उडून मारून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर जाधव याच्या कमरेखालील शरीराची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय तसेच पाली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मानसिक तणावात होता. दरम्यान, आज दुपारी तो घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. बराच वेळ तो परत न आल्याने नातेवाईक व वाडीतील ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान वाडीतील मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीतील पाण्यात मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

ग्रामस्थांनी तत्काळ त्याला विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची (रजि. नं. ५१/२०२६) नोंद केली आहे. घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार (ब. नं. ४०९) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.