रत्नागिरी:- गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबविलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर कारवाई केली. गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनलगतच्या दुसऱ्या जनरल डब्यात बेवारस अवस्थेत आढळलेल्या बॅगेतून गोवा बनावटीच्या दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या.
बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आरपीएफकडून नियमित तपासणी सुरू होती. यावेळी इंजिनच्या बाजूच्या दुसऱ्या जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. बॅगेवर कोणीही दावा न केल्याने आरपीएफ पथकाने ती ताब्यात घेऊन रत्नागिरी आरपीएफ पोस्टवर आणली.
बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा निर्मित दारूच्या १०० छोट्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर नियमानुसार जप्ती पंचनामा करण्यात आला. जप्त केलेला मद्यसाठा पुढील कायदेशीर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी शहर शाखेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. ही कारवाई स.उ.नि. अशोक आर्य आणि ड्युटीवरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी केली.









