Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बंद घराची खिडकी फोडून घरफोडी

बंद घराची खिडकी फोडून घरफोडी

कळंबणी बुद्रुक येथील घटना

खेड:- तालुक्यातील हंबीरवाडी, कळंबणी बुद्रुक येथे एका बंद घराच्या स्वयंपाकघरातील खिडकीची काच फोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत टीव्ही, कुलर आणि स्वयंपाकाची भांडी असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मूळचे हंबीरवाडी, कळंबणी बुद्रुक येथील रहिवासी असलेले रोशन रामकृष्ण हंबीर (वय ४० वर्षे, सध्या रा. बोरज शिव फाटा, ता. खेड) यांचे गावचे घर कुलूपबंद होते. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा ते २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या कालावधीत घराच्या बंद अवस्थेचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने मागून प्रवेश केला. चोरट्याने किचनच्या ओट्यावरील खिडकीची काच फोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश मिळवला. त्यानंतर घरातील सुमारे २० हजार रुपये किमतीचा ३२ इंची ओनिडा कंपनीचा जुना वापरता टीव्ही, सुमारे ५ हजार रुपये किमतीचा सूर्या कंपनीचा कुलर आणि ५ हजार रुपये किमतीची स्वयंपाकाची वापरती भांडी भरलेली दोन पोती असा एकूण ३० हजार रुपयांचा घरगुती माल चोरून नेला.

घरातील साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर रोशन हंबीर यांनी तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.