Thursday, September 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चोरीचे चांदीचे ताट विकायला आलेली महिला रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे चांदीचे ताट विकायला आलेली महिला रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात

रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित सोनाराच्या दुकानात चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा प्रयत्न सोनाराचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे. दुकानात ताट विकण्यासाठी आलेल्या महिलेच्या संशयास्पद हालचाली पाहून सोनाराने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नाट्यमय पाठलाग करत पळून जाणाऱ्या या महिलेला पकडले.

याबाबत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला शहरातील एका नामांकित सराफ दुकानात मौल्यवान चांदीचे ताट विकण्याच्या उद्देशाने आली होती. मात्र, तिच्याकडे असलेले ताट आणि तिची एकंदरीत संशयास्पद वागणूक पाहून सोनाराला शंका आली. कोणताही धोका न पत्करता सोनाराने चाणाक्षपणे पोलिसांशी संपर्क

साधून या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांना सुगावा लागल्याची कुणकुण लागताच या महिलेची धावपळ उडाली आणि घाबरलेल्या महिलेने हातातील चांदीचे ताट दुकानातच टाकून तिथून पळ काढला. दुकानातून पळून गेलेल्या या महिलेचा पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल भाऊ पाटील बागुल यांनी तत्परता दाखवत शहरातील पर्यायी आळी परिसरात पळणाऱ्या या महिलेला ताब्यात घेतले. भरदिवसा घडलेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे शहरात काही काळ खळबळ उडाली होती.

पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित महिलेकडून जप्त करण्यात आलेले चांदीचे ताट हे चोरीचेच आहे. सदर महिलेने हे ताट नेमके कुठून चोरले आहे. या दिशेने पोलिस सध्या कसून तपास करत आहेत.