खेड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; चाकाळे हनुमाननगरमधील घटना
खेड:- जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून घरासमोर बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना चाकाळे हनुमाननगर येथे घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकाळे हनुमाननगर येथील रहिवासी राजेश सखाराम कदम (वय ४५) हे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी जुन्या वादाचा राग उफाळून आल्याने आरोपींनी कदम यांना गाठून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि आरोपींनी कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान संशयित आरोपी दीपक पांडुरंग भिलारे याने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने कदम यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर, पाठीवर तसेच छातीवर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात कदम हे रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर राजेश कदम यांनी खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक पांडुरंग भिलारे, पुष्पा पांडुरंग भिलारे आणि दीपक भिलारे यांचा मुलगा (सर्व रा. चाकाळे जगदीशनगर, ता. खेड) या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, खेड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









