खेडमधील बांधकाम साईटवरील घटना
खेड:- तालुक्यातील भरणे येथील सनसिटी बिल्डिंगच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने एका परप्रांतीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना किंवा सेफ्टी नेट न लावल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता खेड येथील सनसिटी बिल्डिंग, भरणे येथे घडला.
या घटनेत इजहारअली हदिसमियों मन्सुरी (वय २९, मूळ रा. संतपूर, राज्य बिहार) यांचा मृत्यू झाला असून मोहम्मदनसीम राजा मन्सुरी यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गौरव वाल्मिक लांडगे (रा. वेरळ, ता. खेड) आणि सुशांत भगवान तांबे (रा. शिरवली, बौद्धवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरणे येथील सनसिटी बिल्डिंगच्या सी-विंग इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सध्या सेंट्रिंगचे काम सुरू होते. मयत इजहारअली मन्सुरी हा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सेंट्रिंगच्या कामासाठी लागणारी लाकडी फळी देत असताना अचानक त्याचा ताफा सुटून आणि तोल जाऊन तो थेट पोडियम पार्किंगच्या स्लॅबवर खाली कोसळला.
या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि छातीला गंभीर स्वरूपाचा मुकामार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ‘सेफ्टी नेट’ न बसवता मोठा निष्काळजीपणा केल्यामुळेच मजुराला जीव गमवावा लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









