Friday, September 18, 2026
spot_img
Home संगमेश्वर आंबव येथे रानगव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

आंबव येथे रानगव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

डेरवण रुग्णालयात सुरु होते उपचार

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या एका तरुणावर रानगव्याने अचानक जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्निल जयराम पेंडांमकर (वय ३६, रा. सह्याद्रीनगर, साडवली-देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत विजय सुर्वे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वप्निल पेंडांमकर हे दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आंबव येथील ‘श्रवण हॉटेल’जवळ आले होते. त्या ठिकाणी ते लघुशंकेसाठी थांबले असताना अचानक एका रानगव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्निल हे गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने उपचारासाठी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील ‘चिरायू हॉस्पिटल’मध्ये आणि नंतर अधिक गंभीर अवस्थेमुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ‘वालावलकर रुग्णालयात’ हलवण्यात आले.

वालावलकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे साडवली-देवरुख परिसरात शोककळा पसरली आहे.