खेड:- वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा पाठलाग करून हॉटेलमध्ये घुसत मारहाण केल्याची घटना खवटी येथे घडली. याप्रकरणी अमोल दळवी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाखरवाडी, खवटी) याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमावासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी अभय गौतम धोत्रे (२३, रा. नातुनगर, वावे फाटा प्रकल्प वसाहत, बौद्धवाडी, खेड) हे त्यांचा मित्र योगेश विटले यांच्यासोबत बोरघर येथील चायनिज सेंटरसमोर वाहनावर बसले होते. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटची बोलेरो (क्र. एपी-०५०९, पूर्ण क्रमांक माहीत नाही) तेथून जात असताना तिच्या हेडलाईटचा प्रकाश फिर्यादी यांच्या डोळ्यावर पडला.
याबाबत फिर्यादी यांनी वाहनातील व्यक्तींना विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा पाठलाग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर खवटी येथील एनएच-६६ महामार्गालगत असलेल्या सुरुची हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हॉटेलच्या आतील भागापर्यंत आरोपींनी दोघांना हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला दुखापत झाली.
यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अभय धोत्रे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









