Tuesday, September 15, 2026
spot_img
Home संगमेश्वर घराची सफाई करताना वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

घराची सफाई करताना वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील सायेले कानाळवाडी येथे घराची स्वच्छता करत असताना लोखंडी खांबावरून वीजप्रवाह उतरल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील श्रीकांत कानाळ (वय ३५, मूळ रा. सायेले कानाळवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, सध्या रा. घाटकोपर, मुंबई) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कानाळ हे रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या सायेले येथील घराच्या मागच्या पडवीत कचरा साफ करत होते. यादरम्यान घराच्या मागील पडवीतील छपरामधील बल्बची इलेक्ट्रिक वायर उंदरांनी कुर्तडली होती. या कुर्तडलेल्या वायरमधील वीजप्रवाह छपराच्या लोखंडी खांबाला उतरला होता.

कचरा काढत असताना स्वप्नील यांचा हात किंवा स्पर्श या लोखंडी खांबाला झाल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल करण्यात आले; मात्र १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी देवरुख पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार या घटनेचा अधिक तपास करत आहेत.