लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३:४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी चालक शाम सिंग (वय ५८, रा. सुकरताल, सहारनपुर, उत्तर प्रदेश) हा त्याच्या ताब्यातील १२ चाकी टाटा ट्रक (क्रमांक: एचआर ३८ एक्स ०९९३) मध्ये स्लायडिंग माल भरून मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता. ४ सप्टेंबरच्या रात्री पावणेअकराच्या सुमारास आंजणारी पळ येथील रस्ता उताराचा असताना चालकाने त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि ट्रक अतिशय भरधाव व निमंत्रित वेगाने चालवला.
उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात चालक शाम सिंग हा गंभीर दुखापतीमुळे जागीच मयत झाला. तर ट्रकमध्ये असलेले क्लिनर संदिप कृषणलाल कुमार (वय ४१, रा. सहारनपुर, उत्तर प्रदेश) हे उजव्या पायाला गंभीर आणि किरकोळ दुखापतीमुळे जखमी झाले असून, या अपघातात ट्रक व ट्रकमधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जखमी क्लिनर संदिप कृषणलाल कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.









