Sunday, September 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी ‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा; पारंपरिक मिरवणुकीतून आदर्श निर्माण करा

‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा; पारंपरिक मिरवणुकीतून आदर्श निर्माण करा

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील आणि शहरातील सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने साजरा करून ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव मंडळे आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर टाळावा. शहरातील रस्ते अरुंद असल्याने मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने काढाव्यात. डीजे ही आपली संस्कृती नसून त्याच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करावा, असे श्री. बगाटे यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांनी ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे पोलिस विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी. मंडप उभारताना फायर सेफ्टीची काळजी घेण्याबरोबरच मंडप परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. संस्कृतीला साजेसे देखावे उभारावेत तसेच गुलालाचा अतिवापर करून पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मंडळाला स्पीकरच्या आवाजाबाबत डेसिबलची मर्यादा कळविण्यात येणार आहे. त्यानुसारच आवाज ठेवणे बंधनकारक राहणार असून पोलिसांकडून डेसिबलची तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. बगाटे यांनी दिला.

बैठकीत मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी, वीज व्यवस्था यांसह विविध समस्या मांडल्या. प्रत्येक मंडळाला एक पोलिस अमलदार देण्यात येणार असून मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे श्री. बगाटे यांनी सांगितले. गणेशमूर्तीची उंची मर्यादित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर १० मदत केंद्रे उभारण्यात येणार असून तेथे मॅकेनिकची सुविधा उपलब्ध असेल. समुद्रकिनारी गणेश विसर्जनावेळी जीवरक्षकही तैनात करण्यात येणार आहेत.

या बैठकीला १०१ वर्षांची परंपरा असलेल्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळासह रत्नागिरीचा राजा, शांतिनगर, कोकण रेल्वे, ओमसाई मित्रमंडळ, उद्यमनगर, प्रादेशिक गणेशोत्सव मंडळ, महावितरण, बंदर रोड, मुरुगवाडा झोपडपट्टी, पाटबंधारे-कुवारब यांसह २७ गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.