Sunday, September 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहर परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ६ चालकांवर गुन्हे दाखल!

रत्नागिरी शहर परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ६ चालकांवर गुन्हे दाखल!

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालका विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. ४ सप्टेंबर रोजी शहर, ग्रामीण, जयगड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अपघातास आमंत्रण देईल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱ्या ६ वेगवेगळ्या वाहनचालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी मिरजोळे येथील कांचन हॉटेल ते रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ट्रक्स उभे केल्याचे आढळून आले. यात कर्नाटकचे दोन ट्रक चालक कारवाईच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलीस हवालदार लक्ष्मण कोकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रक क्र. KA 28 AC 2117 चा चालक सय्यदबाब मेहबूब मकाशी (वय ३०, रा. बोम्मनजोगी, ता. देवरहिप्पडगी, जि. विजापूर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रुपेश भिसडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, ट्रक क्र. KA 28 AC 2125 चा चालक गुंडप्पा मल्लप्पा हडगी (वय ४७, रा. शिवणगी, जि. विजापूर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली. हॉटेल कुळस्वामिनी मेडिकलसमोर टेम्पो (क्र. MH 08 BC 2209) उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालक रोहित राजेंद्र पाटील (रा. बद्रुम मंजिल, पडवेकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) याच्यावर पो. हवा. कुशल हातिसकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल. आठवडा बाजार ते एसटी स्टँड रस्त्यावर रिक्षा (क्र. MH 08 K 4388) रस्त्यात उभी केल्याने चालक बालाजी किसन चव्हाण (वय २८, रा. नाचणे, रत्नागिरी) याच्यावर स. पो. फो. संदेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती मंदिर ते साळवी स्टॉप रस्त्यावर अभिलाष टूर्ससमोर इनोव्हा क्रिस्ता कार (क्र. MH 08 AG 9600) उभी केल्याप्रकरणी इंद्रनिल अजित जुवेकर (रा. अभ्युदेयनगर, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. मारुती मंदिर सर्कल ते साळवी स्टॉप रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. MH 08 AP 8840) उभा करून पादचाऱ्यांना व वाहनांना अडथळा ठरल्याप्रकरणी शिवप्रसाद संदीप ठाकूर (वय २४, सध्या रा. कारवांच्याची वाडी, मूळ रा. पावडेवाडी, वेणेश्वर) याच्यावर कारवाई करण्यात आली.

ग्रामीण सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. जयगड ते निवळी रस्त्यावर खंडाळा बस स्टॉपजवळ गाडी (क्र. MH 43 CE 1676) रस्त्यात पार्क केल्याप्रकरणी चालक सौरभ मच्छिंद्र भोसले (वय २४, मूळ रा. डिसकल, पुसेगाव, सातारा, सध्या रा. खंडाळा विसावा हॉटेल) याच्यावर जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पो. शि. निलेश गुरव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे पावस एसटी स्टँडसमोर बजाज एम.ए.टी. मोटरसायकल (क्र. MH 08 S 5114) सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक रीतीने उभी केल्याप्रकरणी चालक शादाब रब्बतुल्ला खान (वय ३२, सध्या रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याच्यावर पो. हवा. प्रवीण बेदरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक रस्त्यांवर अवैध पार्किंग करून वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर यापुढेही अशीच कडक आणि धडक कारवाई निरंतर सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.