रत्नागिरी:- ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ व्हावा यासाठी कायदेशीर व घटनात्मक मार्गाने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद आता त्यांच्या मूळ गावी उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील बापट यांच्या मूळ घरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार २४ तास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यातील मारहाणीच्या घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तातडीने सूत्रे हलवली. गुरुवारी पोलिसांनी गोळप येथील घरी जाऊन बापट यांच्या पालकांची विचारपूस केली होती. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी दुपारपासून त्यांच्या घराबाहेर दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. बापट यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी २४ तास ही पोलीस गस्त आणि बंदोबस्त कायम राहणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विद्यानंद बापट यांच्या आई कल्पना बापट आणि वडील सुहास बापट यांनी अतिशय खंबीर आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “डीजेच्या जीवघेण्या दणदणाटाविरोधात आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आमच्या मुलाने उठवलेला आवाज पूर्णपणे योग्य आहे. तो संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. त्याला झालेली मारहाण अत्यंत दुर्दैवी, निंदनीय आणि चुकीची आहे. आम्ही त्याच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्याला प्रशासनाने त्वरित पूर्ण पोलीस संरक्षण दिले पाहिजे.”
डीजे संस्कृतीविरोधात लढा देणाऱ्या एका कार्यकर्त्यावर थेट हल्ला झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एकीकडे पुण्यात या मारहाणीचा सर्वस्तरातून निषेध होत असताना, दुसरीकडे रत्नागिरीत त्यांच्या वृद्ध आई-वडिलांनी दाखवलेल्या या धैर्याचे व ठाम भूमिकेचे कौतुक होत आहे. पोलिसांच्या या तातडीच्या बंदोबस्तामुळे गोळप परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक नजर ठेवली जात आहे.









